उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सद्यस्थितीत विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट काम चालू असून महिलांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला आहे. याचाच अर्थ हळूहळू आपल्या पक्षाची ताकद उदगीर विधानसभा मतदारसंघात वाढू लागली आहे. सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवसेना रुजऊन काम करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर लोकसभा संपर्क प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केले आहे.
ते उदगीर येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
मराठवाड्यावर कोसळलेला कोरडा दुष्काळ, पक्ष बांधणी आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये पक्ष संघटन राबवत असलेले उपक्रम या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांना परमेश्वर सातपुते यांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा संघटक प्रकाश हैबतपुरे, या बैठकीचे संयोजक तथा उदगीर विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव , तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, युवासेना जिल्हा सरचिटणीस रमण माने, शिक्षक सेनेचे सचिन साबणे, उपतालुकाप्रमुख महेश फुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना परमेश्वर सातपुते यांनी स्पष्ट केले की, महायुतीचे सरकार सर्वसामान्य नागरिकांना आश्वासनांची खैरात देऊन वेड्यात काढत आहे. त्यांची फसवेगिरी आता लोकांच्या लक्षात आली आहे. केवळ मोठमोठ्या गोष्टी सांगून वेळ मारून नेण्याची त्यांची हातोटी आता लोकांना कळालेली आहे. त्यामुळे हळूहळू भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिका आता स्पष्ट झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना खोटे बोलून आश्वासनांची खैरात वाटप करणे हा एककलमी कार्यक्रम सरकार सध्या राबवत आहे. त्यामुळे येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साहाने कामाला लागणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनीही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वसामान्य माणूस आणि सरकार यांच्या मधला दुवा बनून काम करणे गरजेचे आहे. कित्येक लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही तो लाभ मिळवून देण्यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे , असे सांगितले.
उदगीर विधानसभा मतदार संघाची ताकद वाढायची असेल तर कार्यकर्त्यांनी तन-मन धन लावून काम करणे गरजेचे आहे. या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात तसेच आत्मीयतेने त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. असे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका आणि कार्याची धमक लोकांच्या नजरेसमोर असल्यामुळे लोक मोठ्या अपेक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे पाहत आहेत. येणारा काळ निश्चितच शिवसेनेचा असणार आहे. त्याच दृष्टीने महिला शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत, असेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर तालुका प्रमुख प्रशांत मोरे यांनी केले. तसेच जिल्हा संघटक प्रकाश शैबतपुरे यांनीही योग्य मार्गदर्शन केले. शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.




Responses (0 )