शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची – माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे
लातूर (एल.पी.उगीले) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या वंचित घटकांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम करतात. सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी या विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक असून यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे, माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांनी आज येथे सांगितले.
‘समता पर्व’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मुळे बोलत होत्या. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कार्यशाळेचे मार्गदर्शक शशिकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, माशुफ खान, दत्तात्रय परळकर, बाळासाहेब होळीकर, लहूजी शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
विकासापासून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. या विभागाच्या योजनांमुळे वंचित घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रमांमुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार असल्याने ‘समता पर्व’ हे एक प्रकारे ‘प्रेरणा पर्व’ ठरेल. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक न्यायाची भूमिका अधिक भक्कम होईल, असा विश्वास डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.
शासनाच्या विविध योजनांची अचूक माहिती समाजातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन-प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. या योजनांची माहिती वंचित घटकांपर्यंत पोहचवून सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करण्यात प्रसारमाध्यमांनीही महत्वाची भूमिका बजाविली आहे. यापुढेही शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. मुळे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांमुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळत असून त्यांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘समता पर्व’ अंतर्गत आयोजित उपक्रमांमुळे मदत होणार आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी पाटील यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीची दिशा गेल्या एक दशकापासून बदलली असून वंचित घटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर या विभागाचा भर आहे. सामाजिक न्याय विभागाने निवासी शाळा,वसतिगृहापासून ते परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसारख्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्याने विकासापासून वंचित राहिलेल्या वर्गातील मुलांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर घरकुल, विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देवून या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम हा विभाग करत आहे. प्रसारमाध्यमांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासह या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींना मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे कार्यशाळेचे मार्गदर्शक शशिकांत पाटील यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असून सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे गरजू व्यक्तींना मदत होत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. खान, परळकर, होळीकर, शिंदे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. चिकुर्ते यांनी ‘समता पर्व’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले, आभार श्रीराम शिंदे यांनी मानले.