स्वच्छतेचे तीन तेरा, जनतेचे आरोग्य धोक्यात – निवृत्ती सांगवे

स्वच्छतेचे तीन तेरा, जनतेचे आरोग्य धोक्यात - निवृत्ती सांगवे

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर शहरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून स्वच्छता विभागाच्या नावाने बोंब उठलेली असताना देखील प्रशासनाकडून या बाबीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. उदगीरच्या जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करावी. अशी मागणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा उदगीर नगरपरिषदचे माजी नियोजन सभापती निवृत्तीराव सांगवे यांनी केली आहे.

जवळपास गेल्या दोन अडीच महिन्यापासून उदगीर शहरातील स्वच्छतेचे टेंडर ज्यांना दिले होते, ते कंत्राटदार निघून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वच्छता विभागातील कामगारांचे वेतन आणि रोजंदारीवरील मजुरांना रोजगार मिळाला नाही. परिणामतः कामगारांनी काम करणे बंद केल्याने, शहरातील कित्येक नाल्या तुंबलेल्या असून ज्या ठिकाणी कचरा टाकला गेला आहे, त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अशामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सद्यस्थितीत प्रशासक असल्यामुळे यासंदर्भात अधिक दक्षतेने काम होणे गरजेचे होते. मात्र मध्यंतरीच्या काळात प्रभारी मुख्याधिकारी असल्याने आणि त्यानंतर तीन-चार दिवस मुख्याधिकारीच नगरपालिकेत आले नसल्याने, ही बाब सांगावी तरी कोणाला? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. आता सर्व शिस्तीत असताना देखील, स्वच्छता विभाग या बाबीकडे कधी गांभीर्याने पाहणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

उदगीर नगरपालिकेने अनेक वेळा स्वच्छ उदगीर सुंदर उदगीर, हरित उदगीर या घोषवाक्यांनी प्रत्यक्ष कृती करून राज्य पातळीवरील आणि देश पातळीवरील स्वच्छतेचे पारितोषिके मिळवली आहेत. मात्र सध्याची जनतेची ओरड आणि कचऱ्याचे ढीग पाहता या उल्लेखनीय परंपरेला काळीमा फासली जाते की काय? असाही प्रश्न निवृत्तीराव सांगवे यांनी उपस्थित केला आहे.

एका बाजूला स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, प्रशासनाच्या काळात अचानकपणे भरमसाठ वाढीव नळपट्टी कर आकारणी केलेली आहे. नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधा पुरवण्यापेक्षा आर्थिक सबळतेवर प्रशासनाने दिलेला भर, गोरगरीब जनतेसाठी अत्यंत चिड आणणारा प्रकार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळून पैसे लुबाडण्याचा चालवलेला हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. असाही इशारा निवृत्तीराव सांगवे यांनी दिला आहे.

उदगीर शहरातील कचरा हा फुलेनगर परिसरातील रिकाम्या जागेवर टाकला जातो आहे. तसेच विद्यार्थी आणि तरुणांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्य विकसित व्हावेत म्हणून निर्माण केल्या जाणाऱ्या स्टेडियम च्या मोकळ्या जागेतही कचऱ्याचे ढीग लागले आहेत. लोक वस्तीच्या ठिकाणी अशा पद्धतीचे कचऱ्याचे ढीग निश्चितपणे जनतेसाठी धोकादायक आहेत.या कचऱ्याच्या ढिगार्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना देखील आपली कैफियत सांगितली होती. प्रत्यक्ष त्यांना कचऱ्याचे ढीगही दाखवले होते, मात्र अद्यापही त्या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे अगोदरच गोरगरिबांची वस्ती असलेल्या या भागात जर साथीचे रोग पसरले तर, जनतेचे आरोग्य धोक्यात येणार आहे. याचे गांभीर्य विचारात घेऊन तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि एमआयएम च्या वतीने करण्यात येत आहे. अशी ही माहिती निवृत्तीराव सांगवे यांनी दिली आहे.

About The Author