अवैध वाळू उपसा बोट केली नष्ट तहसीलदार सुरेश घोळवे यांची कामगिरी
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील अवैध वाळू उपसाला प्रतिबंध घालण्यासाठी महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेत, अवैध वाळू उपसा करणाऱ्या नदीपात्रातील बोटीला जिलेटिन च्या साह्याने उध्वस्त केले आहे. यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, हिसामनगर येथून वाहणाऱ्या मांजरा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करण्यासाठी उभी करण्यात आलेली बोट, प्रशासनाने बुधवारी पहाटे जिलेटिनच्या साहाय्याने उडविली आहे. या कारवाईमुळे अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या पवित्र्यामुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा उंचावली असून, भविष्यात अवैध वाळू उपसा करण्याचा विचारही वाळू माफिया करणार नाहीत. अशी चर्चा जोर धरू लागली आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी अतिश बनसोडे, अब्रार शेख, सचिन बोटुळे आदी उपस्थित होते. तहसीलदार घोळवे यांच्या आक्रमक भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात असून अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सर्वच विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.