पीक कापणी प्रयोगाचे पंचनामे सत्य परिस्थितीनुसार करून घ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे बसवराज रोडगे यांचे आवाहन; एनडीआरएफच्या मदतीसाठी पंचनामे महत्त्वाचे

Written by

in

उदगीर (एल पी उगीले) सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग (क्रॉप कटिंग) व नुकसान पंचनामे सत्य परिस्थितीनुसार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपल्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद पंचनाम्यात करून घ्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बसवराज रोडगे यांनी केले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पीक कापणी प्रयोग व पंचनाम्यांची भूमिका महत्त्वाची आहे. एनडीआरएफसारख्या आपत्ती निवारण यंत्रणेकडून मदत मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत पीक कापणी प्रयोग व नुकसान नोंदी महत्त्वाच्या ठरतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये, असे रोडगे यांनी म्हटले आहे.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये संबंधित विमा कंपन्यांनी ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच यादृच्छिक पद्धतीने (रॅन्डम) निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर बोलावून पीक कापणी प्रयोग व पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शेतातील प्रत्यक्ष उत्पादन, पिकाची स्थिती आणि झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पीक कापणी प्रयोग आणि पंचनामे करताना शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या शेतातील प्रत्यक्ष नुकसानीची योग्य नोंद झाली आहे की नाही, याची खात्री करावी. चुकीची किंवा अपूर्ण नोंद झाल्यास त्याचा परिणाम नुकसानभरपाईच्या लाभावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्तरीय यंत्रणेशी समन्वय ठेवून पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शकपणे करून घ्यावी, असे आवाहन रोडगे यांनी केले.

“सत्य परिस्थितीचे पंचनामे झाले तर शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या मदतीचा योग्य लाभ मिळण्यास मदत होईल. त्यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी आल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर उपस्थित राहून आपल्या नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून घ्यावी,” असे बसवराज रोडगे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ प्रशासनाच्या प्रक्रियेवर अवलंबून न राहता आपल्या नुकसानीची योग्य नोंद झाली आहे की नाही, याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *