गहाळ मोबाईल शोधण्यात विवेकानंद चौक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Written by

in

लातूर (एल पी उगीले) येथील

नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याच्या अनुषंगाने विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन तब्बल ११ गहाळ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून ते संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

मोबाईल फोन हा सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बँकिंग व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, शासकीय सेवा, शिक्षण, कार्यालयीन कामकाज, संपर्क तसेच विविध महत्त्वाची वैयक्तिक माहिती मोबाईलमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे मोबाईल फोन गहाळ झाल्यास नागरिकांना आर्थिक तसेच दैनंदिन व्यवहारांच्या दृष्टीने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

या पार्श्वभूमीवर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन तसेच त्याबाबत पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला. सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर करून गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला आणि ११ मोबाईल फोन हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.

गहाळ मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत त्यांना मदत करण्यासाठी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *