भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताहाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

Written by

in

लातूर (एल पी उगीले) एक निकोप आणि सुदृढ समाज निर्माण व्हायचा असेल तर सामाजिक जाणीव जपत, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. कायद्याचा सन्मान केला पाहिजे. जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे पोलीस प्रशासनाला सोयीचे होईल. कायद्याने लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही गुन्हे आहेत. त्यासंदर्भामध्ये जनतेमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. देणाऱ्याने नाही दिल्यास घेणारा कुठून घेईल? जर कोणी लाच मागितली तर त्या अनुषंगाने तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याची सोय आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी. असे आवाहन लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी केले आहे. ते लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताह 2026 च्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, संजय केसरे, मोटार परिवहन विभागाचे निरीक्षक सोनटक्के तसेच लाच लुपत प्रतिबंधक विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने बनवण्यात आलेले भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणारे पोस्टर्स, बॅनर, स्टिकर्स याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार जनजागृती रथाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून लातूर शहरात ऑटो चालकांची रॅली काढण्यात आली. सदरील रॅली शहरातील मुख्य रस्त्यावर फिरून नंतर भ्रष्टाचार निर्मूलन विभागाच्या कार्यालयात आली. त्यानंतर सदरील जनजागृती रथ संपूर्ण लातूर जिल्ह्यात रवाना करण्यात येणार आहे. ज्या रथाच्या माध्यमातून लोकांना लाचखोर प्रवृत्तीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये निर्भीडपणे तक्रार नोंदवण्याची हिंमत आणि कुठे तक्रार करावी? या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी ही माहिती सदरील कार्यक्रमातून देण्यात आली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणी त्रयस्थ व्यक्ती शासकीय काम करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे लाच म्हणून मागत असेल तर, तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *