शास्त्री प्राथमिक विद्यालयात सुधाकर पोलावार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

Written by

in

उदगीर (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयातील शिक्षक सुधाकर भागवत पोलावार हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलावार यांचे कुटुंबीयांसह ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित केले.या अनोख्या स्वागताने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सतनप्पा हुरदळे, धनबा चंद्रकांत, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक,पोलावार गुरुजींचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सुधाकर पोलावार सर यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. लाल बहादुर शास्त्री पतसंस्थेच्या वतीने श्याम गौंडगावे व अतुल गुरमे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मित्रपरिवार व हितचिंतकांनीही त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रास्ताविकातून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी पोलावार सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा, कार्यनिष्ठेचा, सहकार्यशील स्वभावाचा आणि शाळेच्या प्रगतीतील योगदानाचा गौरव केला. त्यांच्यासोबतचा सहवास आठवताना मोठ्या भावाप्रमाणे मिळालेले मार्गदर्शन, आपुलकी आणि सहकार्य यांचा भावपूर्ण उल्लेख केला. शिक्षक हा केवळ सेवेतून निवृत्त होतो; मात्र त्याने विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार आणि समाजाला दिलेले योगदान कायमस्वरूपी स्मरणात राहते, असे त्यांनी सांगितले.यावेळी श्याम गौंडगावे,श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी,सौ.सोनिया देशपांडे, माधव केंद्रे आणि मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपल्या मनोगतातून पोलावार सरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या स्वभावातील प्रेमळपणा, सहकार्याची वृत्ती, कामाप्रती असलेली निष्ठा आणि सहकाऱ्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा गौरव केला.पोलावार सरांच्या नातेवाईकांनीही आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रमुख पाहुणे शंकरराव लासुणे यांनी आपल्या गौरवपर भाषणात शिक्षकाचे कार्य हे केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित नसून राष्ट्र आणि समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे प्रतिपादन केले. पोलावार सरांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या जडणघडणी साठी आणि संस्थेच्या शैक्षणिक ध्येयपूर्तीसाठी दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपला अनुभव, ज्ञान आणि मार्गदर्शन समाजासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात व्यंकटराव गुरमे यांनी, एखाद्या शिक्षकाची खरी संपत्ती म्हणजे त्याने जोडलेली माणसे, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेला आदर आणि सहकाऱ्यांमध्ये मिळवलेला विश्वास होय, असे सांगितले. पोलावार सरांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला आदर्श नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्गार काढून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व समाधानाच्या शुभेच्छा दिल्या.

“माणूस सेवेतून निवृत्त होतो; मात्र त्याच्या कार्यातून निर्माण झालेला आदर्श कधीच निवृत्त होत नाही,” या भावनेतून संपन्न झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांना भावूक केले. पोलावार सरांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करताना त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

स्वागत व परिचय श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले.वैयक्तीक पद्य मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना सुवर्णकार यांनी केले,तर श्रीदेवी कबाडे यांनी आभार मानले. सौ. भाग्यश्री स्वामी यांच्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *