नवरात्र महोत्सव सांस्कृतिक मूल्यांसोबत आनंदवर्धित करणारा सण ना. संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : नवरात्रीच्या दरम्यान भारतीय संस्कृतीचे जतन करत विविध महोत्सव साजरे केले जातात यातून सांस्कृतिक मूल्यांसोबतच आनंद निर्माण करणारे व परस्परांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत करणारे वातावरण निर्माण होते असे उद्गार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. शहरातील नगरपरिषदेच्या वतीने शारदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. यामुळे उदगीरकरांचे मनोरंजन होत असुन या शारदोत्सवाची सुरुवात १९९८ पासून केली जात आहे, तीच परंपरा आजतागायत सुरु आहे.आई जगदंबेच्या चरणी घटस्थापना झाल्यावर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. उदगीरकरांचा भौतिक विकासा बरोबरच सांस्कृतिक विकास झाला पाहिजे असेही मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते नगर परिषद उदगीरच्या वतीने आयोजीत शारदोत्सव -२०२३ च्या आॅल इंडिया मुशायरा व कविसम्मेलनास प्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते. यावेळी ना.बनसोडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ नेते व्यंकटराव बेद्रे,भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, शहराध्यक्ष समीर शेख, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले. सुत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.