चंदन चोराला लातूर पोलिसांचा दणका, चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Written by

in

लातूर (एल पी उगीले)पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळत आहे ; ज्यामध्ये ५४० किलो चंदन व अवजारे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

महाराष्ट्र शासनाने तोडणीस प्रतिबंधित व संरक्षित केलेल्या चंदन वृक्षांची अवैध तोडणी करून चंदनाचा गाभा व लाकडाचे तुकडे साठवणूक करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण ११ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५४० किलो चंदनाचा मुद्देमाल तसेच चंदनाची तोडणी व प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे जप्त केली आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी १८.३५ वाजण्याच्या सुमारास मौजे आनंदवाडी, ता. चाकूर येथील चापोली ते नायगाव जाणाऱ्या रस्त्यावरील फार्म हाऊसलगत असलेल्या शेतशिवारात आरोपी

नरसिंग रामा बंदराळे, (वय ५० वर्षे, रा. आनंदवाडी, ता. चाकूर), वसंत भानुदास चांनकाणे, (वय ४० वर्षे),

संतोष वैजनाथ चांनकाणे, (वय ३५ वर्षे), बालाजी भानुदास चांनकाणे, (वय ४२ वर्षे, तिघेही रा. वाढवणा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी संगनमत करून शासनाने तोडणीस प्रतिबंधित व संरक्षित केलेल्या चंदन वृक्षांची अवैध तोडणी करून त्यांची साल काढून चंदनाचा गाभा व लाकडाचे तुकडे तयार करून पोत्यांमध्ये भरून साठवून ठेवल्याचे आढळून आले.

पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या चार पोत्यांमध्ये भरलेला एकूण ३० किलो चंदनाचा गाभा, प्रति किलो ५ हजार रुपये दराने १ लाख ५० हजार रुपये किमतीचा, तसेच पांढऱ्या रंगाच्या २८ पोत्यांमध्ये भरलेले एकूण ५१० किलो चंदनाचे लाकडी तुकडे, प्रति किलो २ हजार रुपये दराने १० लाख २० हजार रुपये किमतीचा, असा एकूण ११ लाख ७० हजार रुपये किमतीचा चंदनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय चंदनाची झाडे तोडणे व त्यांची साल काढण्यासाठी वापरण्यात येणारे चार लोखंडी वाकस, दोन लोखंडी छन्नी व दोन लोखंडी कुऱ्हाडी अशी अवजारेही जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलीस अमलदार अनिल श्रीरामे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९४/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ अन्वये चार आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. चामले हे करीत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *