लोकभाषांना जिवंत ठेवते ती अभिजात भाषा-डॉ. साहेब खंदारे
उदगीर (एल.पी.उगीले) : लोकभाषांना जिवंत ठेवते ती अभिजात भाषा होय. लोक जीवनाचे संदर्भ जेव्हा भाषेला प्राप्त होतात. तेव्हा भाषा जिवंत होते. भाषेचा लहेजा लोक भाषांमधून आविष्कृत होतो. भाषेतून शुद्धा शुद्ध असे काही नसते. भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रुपांहून भिन्न असले तरी चालेल. पण तिच्यामध्ये आंतरिक नाते असावे. असे प्रतिपादन डॉ. साहेब खंदारे यांनी काढले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते. विचार मंचावर मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. कांत जाधव,ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार, रासेयो विभागाचे मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरेश शिंदे, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय निटुरे होते. पुढे बोलताना डॉ.खंदारे म्हणाले की, लोककथा, लोकगीत म्हणी, उखाणे यामधील भाषा रूपाने मराठी भाषा अभिजात झाली.मौल्यवान वारसा म्हणता येईल इतके प्राचीन वाङ्मय लोकभाषेत आहे.अशी भाषा स्वतःची परंपरा निर्माण करत असते. अध्यक्षीय समारोपात डॉ. मांजरे यांनी अभिजात भाषे बद्दल मत व्यक्त करताना म्हणाले, की जी भाषा व्यवहाराची भाषा बनते. ती अभिजात भाषा होय. अशा भाषेने समाजाला जोडण्याचे कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रो.डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ए. सी. आकडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. संजय निटुरे यांनी मानले. यावेळी डॉ. व्ही.के.भालेराव, डॉ. एम. एन. शेख, डॉ.एस. एम.कोनाळे,गोविंद खराबे, डॉ.धोतरे,डॉ.गणेश बेळंबे, डॉ. विलास गाजरे, डॉ.व्ही.डी.गायकवाड, एनएसएस विभागाचे स्वयंसेवक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.