लोकशाही बळकटीसाठी मतदारांनी जागृत होणे आवश्यक – डॉ. प्रकाश चौकटे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात असून या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जात, धर्म, प्रांत,भाषा, पैसा या गोष्टींना बळी न पडता सद्यस्थितीत मतदारांनी जागृत होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राजकीय विश्लेषक तथा अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश ससाणे हे होते तर डॉ. प्रकाश चौकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. चौकटे म्हणाले की, भारतीय संविधान सर्वसामान्यांना समजणे आवश्यक आहे. संविधानातील प्रत्येक तरतुदीची माहिती नागरिकांना होणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने शासनाने विविध माध्यमांद्वारे जनजागरण करणे ही आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तरच लोक कल्याणकारी राज्य निर्माण होईल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभाप्रसंगी डॉ. सतीश ससाणे म्हणाले की, भारतीय लोकशाही आदर्श असून ती अधिकाधिक मजबूत करण्यासाठी शासन, प्रशासन, नागरिक आणि पत्रकारांनी आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बब्रुवान मोरे यांनी उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी तर आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.