महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते – डॉ. अनिल महाराज मुंढे

0
महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते - डॉ. अनिल महाराज मुंढे

महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते - डॉ. अनिल महाराज मुंढे

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले यांनी भारतात शैक्षणिक क्रांती केली. एवढेच नाही तर त्यांना शेतीची क्रांतीही करायची होती. शेतीमातीच्या प्रश्नांवर पोटतिडिकीने लिखाण करून महात्मा फुले यांनी बहुजन समाजात जागृती केली. महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते, असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने महात्मा फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक लिहून शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा जगासमोर मांडले. तसेच ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. एवढेच नव्हे तर इंग्रज सरकारला देखील शेतकरी वेशात जाऊन निवेदन दिले. महात्मा फुले यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी महात्मा फुले यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विचारांचा आढावा घेतला. महात्मा फुले यांचे विचार शासनाने प्रत्यक्ष कृतीत उतरवावेत असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले, तर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!