मोहरम च्या मुहूर्तावर सांगवे यांच्यातर्फे अन्नछत्र
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील नगर परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रीय दलित विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांच्या वतीने उदगीर शहरातील मुस्लिम बांधवांसाठी अन्नछत्र सुरू केले. प्रथमतः उदगीर शहरातील एक पवित्रस्थळ असलेल्या सात सैलानी येथील पवित्र ईदगाह येथे चादर चढवून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि नौशाद पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आयोजक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी स्पष्ट केले की, या पवित्र महिन्यांमध्ये अन्नदान करून गोरगरिबांना शक्य असेल तेवढी मदत करण्याच्या उद्देशाने अन्नदान करण्यात येत असून उदगीर शहरातील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचे समाधानी त्यांनी व्यक्त केले. समाजामध्ये भाईचारा राहावा, या उद्देशाने हिंदू-मुस्लीम भाई भाई हे ब्रिद कायम टिकवण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.