उदगीर (प्रतिनिधी) सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होरपळत असताना, केवळ आश्वासनाची खैरात करून राजकारण करण्याचा डाव मांडला आहे. गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. यातच दिवाळी सारखा सर्वात मोठा सण आला आहे. या सणाच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे, मात्र ते पूर्ण होईल तेव्हा होईल! होईल की नाही हेही देव जाणे !! मात्र गोरगरीब, शेतमजूर, कष्टकरी, सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांनी सण साजरा करावा. यासाठी यापूर्वी ज्या पद्धतीने दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा म्हणून रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल, डाळी यांचे एकत्र गाठोडे करून आनंदाचा शिधा म्हणून वाटप केला जात होता. त्याच पद्धतीने यावर्षीही आनंदाचा शिधा वाटप करावा. यावर्षी प्रचंड दुष्काळाने सर्वच माणसे होरपळत असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोप घेत आहे. शासनाने तात्काळ दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा वाटप करावा. अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघ दुष्काळी तालुका म्हणून ट्रिगर एक मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विधानसभा मतदार संघांमध्ये तातडीने लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करावा. उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये अशा पद्धतीचा शिधा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजा उदार झाला हाती भोपळा दिला म्हणतात, त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी भेट देण्याची घोषणा केली, मात्र ती घोषणा हवेतच विरते की काय? अशी शंकाही स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी वर्गातून देखील शासनाची मदत न मिळाल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. सरकारला शेतकऱ्याचे अनुदान आणि आनंदाचा शिधा वाटप करण्यामध्ये नेमकी काय अडचण आहे? किंवा कोणी विरोध केला आहे काय? यासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. उधार उसनवारी करा, पण सण साजरा करा. ही हिंदू परंपरा असल्याने दिवाळीच्या सणासाठी सर्वजण वेळप्रसंगी खाजगी सावकाराचे कर्ज काढून सण साजरा करतील, याची जाण सरकारला असून देखील सरकार उदासीन का आहे? हे न समजणारे कोडे असल्याचे स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानाच्या समोर गोरगरिबांच्या रांगा लागत आहेत. मात्र आनंदाचा शिधा ऐकायलाही मिळत नसल्याने राज्य शासनाच्या विरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
बाजारात प्रचंड महागाई थयथय नाचत आहे. महागाईला रोखण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारावर नागरिक चिडत असल्याने, स्वस्त धान्य दुकानदार ही आमच्याकडे साठा उपलब्ध होईल, तेव्हा आम्ही सर्वांना वाटप करू. असे मेटाकुटीला येऊन सांगत आहेत. हिंदू परंपरेमध्ये सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीमध्ये तरी सरकारने गोरगरिबांचे हाल करू नयेत, चार दिवस गोडधोड खाता येईल, या पद्धतीचा तरी आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत गरिबांना पुरवठा करावा. अशी ही आग्रही मागणी स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.
इतर वेळा शासन आणि प्रशासन कितीही बेजाबाबदारपणे वागले, तरीही सर्वसामान्य नागरिक या संदर्भात फारशी ओरड करत नाही. मात्र आता दिवाळीच्या सणात जर त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे पाप सरकार करत असेल तर सरकारला धारेवर धरल्याशिवाय जनता सोडणार नाही. असे उघड उघड लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ आनंदाचा शिधा वाटप करावा, आणि गोरगरिबांचे पुण्य पदरात वाटून घ्यावे. असेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले आहे.














Responses (0 )