उदगीर ग्रामीण पोलिसांची पुन्हा धमाकेदार कामगिरी !! 12 तासांत शोधून काढली जनावर चोरी!!

Written by

in

उदगीर (एल पी उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे रुजू झाल्यापासून एका नंतर एक उत्कृष्ट तपास आणि अवैध धंद्याला लगाम घालण्यात ग्रामीण पोलीस यशस्वी झाले आहेत. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जनावर चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावून एक आदर्श निर्माण केला आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत जनावर चोरीचा गुन्हा घडला की, त्या जनावराला लगेच कत्तल करण्यासाठी खाटकाकडे विकले जात असल्याची चर्चा होत होती. त्यामुळे जनावर चोरीचा गुन्हा शोधणे आणि तेही तातडीने हे मोठे कौशल्यच म्हणावे लागेल.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला एक आदर्श ठसा निर्माण केला आहे. या जनावर चोरीच्या गुन्ह्यात देखील एका आरोपीला अटक करून चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत करण्यात आली आहेत. उदगीर ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फिर्यादी प्रकाश मनोहर चव्हाण (वय 32, रा. गणेशनगर, येणकी रोड, उदगीर) यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यातून अज्ञात चोरट्याने दोन मुरा जातीच्या वगारी आणि एक मुरा जातीचा हालगट अशी एकूण तीन जनावरे चोरून नेली होती. ही घटना दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 ते 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.00 वाजेच्या दरम्यान घडली होती. चोरीस गेलेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे 70,000 रुपये आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी रात्रीतूनच गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीस अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली तिन्ही जनावरे सुखरूप हस्तगत करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नामदेव चेवले, बजरंग गज्जलवार, अभिजीत लोखंडे, संदीप केंद्रे, सचिन नाडागडे , राजकुमार डबेटवार, राजकुमार देवडे आणि त्यांच्या साथीदारांनी याप्रकरणी मोलाची कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार केंद्रे हे करीत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *