किल्लारीत तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा; ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त,१३ जणांविरुद्ध कारवाई;

Written by

in

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली औसा व किल्लारी पोलिसांच्या संयुक्त पथकाने किल्लारी येथे तिर्रट जुगारावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणारे व खेळविणारे एकूण १३ जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, १५ मोबाईल फोन, तीन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४६ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत किल्लारी शहराजवळील विरळ वस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये पैशांची बाजी लावून तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा व किल्लारी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन टेबलांवर जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले.

या कारवाईत १२ प्रौढ व्यक्ती आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक असे एकूण १३ जण मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४६ हजार २० रुपये रोख रक्कम, १५ मोबाईल फोन, तीन मोटारसायकली तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ), ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मरडे करीत आहेत.

सदरची कारवाई औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली औसा व किल्लारी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली.

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा गैरकृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *