युवकास कपडे काढून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येताच लातूर पोलिसांकडून तात्काळ दखल; एका आरोपीला अटक, तिघांच्या शोधासाठी पथके रवाना

लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून दररोज गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याच्या अनुषंगाने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे निदर्शनास येताच, लातूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पीडित मुलाचा शोध घेऊन व्हिडिओतील चार आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदर घटना जून महिन्यातील असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो, अपहरण, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन :- पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची ओळख उघड होईल असा व्हिडिओ प्रसारित करणे टाळावे. असा व्हिडिओ कोणीही पुढे पाठवू नये, किंवा सोशल मीडियावर व्हायरल करू नये. पीडित बालकाची ओळख व गोपनीयता जपण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे. पीडित अल्पवयीन बालकाची ओळख उघड करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *