हरवलेले ५१ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन,लातूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;

Written by

in

लातूर (एल पी उगीले) शहरातील

नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत करण्याच्या मोहिमेत लातूर शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लातूर शहरातील एमआयडीसी, शिवाजीनगर आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकूण ५१ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.

मोबाईल फोन हरवल्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी CEIR पोर्टलचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन ५१ मोबाईल फोन शोधण्यात आले.

शोध घेण्यात आलेले मोबाईल संबंधित मूळ मालकांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पडताळणी अंती परत करण्यात आले. मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अनेक नागरिकांनी लातूर पोलिसांचे आभार मानत पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक साधन बनला आहे. बँकिंग, शिक्षण, कार्यालयीन कामकाज, संपर्क, ऑनलाइन व्यवहार तसेच विविध शासकीय आणि वैयक्तिक कामांसाठी मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मोबाईल हरविल्यास नागरिकांना केवळ मानसिक त्रासच होत नाही, तर आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो.

अनेक नागरिक आर्थिक नियोजन करून, बचत करून किंवा हप्त्यांवर मोबाईल खरेदी करतात. त्यामुळे मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा खरेदी करणे प्रत्येकासाठी सहज शक्य नसते. अशा परिस्थितीत पोलिसांनी तक्रारींची दखल घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करत हरवलेले मोबाईल शोधून परत केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कारवाईमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याने १९, शिवाजीनगर पोलीस ठाण्याने २१ आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने ११ मोबाईल फोन, असे एकूण ५१ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.

ही कामगिरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चावरे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लातूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, या कामगिरीमुळे “तक्रार केल्यानंतर पाठपुरावा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना दिलासा” या भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *