अवैध वाळू माफियांच्या विरोधात वाढवणा पोलिसांची कारवाई,गुन्हा दाखल

अवैध वाळू माफियांच्या विरोधात वाढवणा पोलिसांची कारवाई,गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुक्यात मोठ्याप्रमाणात वाळूची तस्करी होत असुन महसुल प्रशासन बघायची भुमिका घेत असतांना वाढवणा पोलिसांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कार्यवाही मुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असुन अशी कार्यावाही तालुक्यातील प्रत्येक वाळू माफियांवर होणे गरजेचे आहे.

वाढवणा पोलिसांनी वाळू तस्करी करणारा हायवा क्र. एम एच ४ जीसी ४८१५ या गाडीवर कार्यवाही करीत सदर गाडी व वाळू जप्त केली आहे.उदगीर तालुक्यातील मोठ्याप्रमाणात अवैधरित्या वाळू तस्करी होत आहे. वाळू माफिया साम, दाम, दंड चा वापर करून बेडरपणे वाळू उपसा व तस्करी करीत आहेत. याकडे महसुल प्रशासन कसलीच कार्यावाही करीत नसल्याचे दिसुन येत असतांनाच वाढवणा पोलिसांकडून वाढवणा पाटी ते किन्नीयल्लादेवी गावा जवळ हायवा क्र. एम एच ४ जीसी ४८१५ बेकायदेशीर चोरून वाळू तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. चालक सुनील अशोक पाटील यांची चौकशी केली असता, गाडीत पाच ब्रास वाळू असल्याचे सांगीतले. पोलिस कर्मचारी रामदास गंगाधर नागरगोजे यांच्या फिर्यादी वरुन चालक सुनील अशोक पाटील रा. शिरूर जाणापुर व दस्तगीर पठाण रा. शेळगाव ता. चाकुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच ब्रास वाळू रक्कम वीस हजार रुपये व हायवा जप्त करण्यात आले. या प्रकरनात सुनील पाटील यास अटक करण्यात आली आहे. दस्तगीर पठाण हा फरार असल्याचे समजते.

पुढील तपास पोलिस निरिक्षक पठाण यांच्या मागदर्शनाखाली वाढवणा पोलीस करीत आहेत. या कार्यवाही मुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असुन महसूल विभागाने अशी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

About The Author