राज्य सरकारकडून कारवाईला सुरुवात; जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
आंतरवाली गावात शुक्रवारी दुपारी 250 पोलिस आंदोलनस्थळी आले. त्यांनी सोबत आणलेल्या डॉक्टरांकडून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रक्त तपासणी केली. आमचे काम संपले आहे, आता आम्ही माघारी जातो, असे म्हणत उपस्थितांना बेसावध केले. नंतर अवघ्या पाच मिनिटांनी पोलिसांनी साखळी केली. विनवणी करणाऱ्या स्वयंसेवकांना चिमटे तसेच पोटात बुक्के मारायला सुरुवात केली. गर्दी करून धक्काबुक्की करत पोलिसांनी थेट लाठीमार सुरू केला. महिलांनाही मारहाण केली. यामुळे चिडलेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रतिकार करण्यासाठी दगडफेक केली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
लाठ्या, अश्रुधुर नळकांड्यांमुळे आंदोलक जखमी
पोलिसांच्या लाठीमारात 250 हून जास्त आंदोलक जखमी झाले. काहींना छर्रे, अश्रुधुराच्या नळकांड्यांमुळे मोठी दुखापत झाली. त्यांच्यावर अंबड ग्रामीण रुग्णालय, खासगी व वडीगोद्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
19 बसेस जाळल्या
जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. संतप्त मराठा तरुणांनी काही ठिकाणी एसटी बससेची जाळपोळ व तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. राज्यात एकूण 19 एसटी बसेसचे यामुळे नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आजदेखील राज्यभरात उमठत आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी मराठा संघटना, रस्त्यावर उतरल्या आहेत.
मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आठी ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. मराठा समाजासह काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी, रास्ता रोको करण्यात येत आहे. आज सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात आले. यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, उद्या छत्रपती संभाजीनगर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातही उद्या मराठा संघटनांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.