विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणारा १० लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा जप्त; वाहनासह १३.०८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

Written by

in

लातूर (एल पी उगीले) शहरातील ताजोदीन बाबा दर्गा परिसरातील कारवाई; पोलिसांची चाहूल लागताच दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार.

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा सुगंधित जर्दा तसेच त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टाटा एसीई गोल्ड कंपनीचे पांढऱ्या रंगाचे वाहन, असा एकूण १३ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण अंधाराचा व परिसरातील गल्लीबोळांचा फायदा घेऊन फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्र व त्यांचे पथक लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांची माहिती संकलित करून कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी रात्री सुमारे २२.१० वाजता लातूर शहरातील ताजोदीन बाबा दर्गा परिसरात असताना, ताजोदीन बाबा दर्गा ते ताजोदीन बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून टाटा एसीई गोल्ड कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी ताजोदीन बाबा दर्गा ते ताजोदीन बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला. थोड्याच वेळात माहितीमध्ये नमूद केलेले टाटा एसीई गोल्ड कंपनीचे पांढऱ्या रंगाचे वाहन क्रमांक एमएच २४ ए.यू. ८६३३ घटनास्थळी आले. पोलिसांनी वाहनचालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच वाहनचालक आणि त्याच्यासोबत असलेला जुनेद साबेर सिद्दीकी, रा. लेबर कॉलनी, लातूर यांनी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि तेथून पळ काढला.

त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये पिवळ्या रंगाच्या पोत्यांत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध नावाचे लेबल लावलेल्या पॉकेटमध्ये मध्ये सुगंधित जर्दा आढळून आला. पोलिसांनी सदर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असून या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित जर्दा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण १३,०८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्र, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, प्रवीण कोळसुरे यांनी केली असून लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *