Police Flash News

हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने ९२३६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई, पोलिसांचा नागरिकांच्या सुरक्षेवर भर; अपघातातील जीवितहानी शून्यावर आणण्याचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा प्रयत्न

0
57
हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने ९२३६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई,

 पोलिसांचा नागरिकांच्या सुरक्षेवर भर; अपघातातील जीवितहानी शून्यावर आणण्याचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा प्रयत्न

लातूर (एल पी उगिीले) जिल्ह्यामध्ये

वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, नागरिकांचे प्रबोधन करून लातूर जिल्हा पोलिसांनी दि. १ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचा पहिला टप्पा राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर राबविण्यात येत असून, आतापर्यंत ९२३६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेल्मेट सक्तीचा निर्णय हा केवळ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला नसून, नागरिकांचे प्राण वाचविणे आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे लातूर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दररोज घेतला जातो मोहिमेचा आढावा

हेल्मेट सक्तीच्या मोहिमेचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून दररोज आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना देऊन कारवाईसोबतच नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रभावी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.

दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या जीविताचे रक्षण करण्याची आणि आपल्या कुटुंबाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश पोलिसांकडून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

‘हेल्मेट म्हणजे कुटुंबासाठी सुरक्षा कवच’

रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता मोठी असते. अशा वेळी दर्जेदार हेल्मेट जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईची भीती न बाळगता स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘हेल्मेट हे ओझे नसून कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे’, हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे. स्वतःचा जीव सुरक्षित ठेवून आपल्या कुटुंबाचा आधार कायम ठेवायचा असेल, तर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हेल्मेट विक्रेत्यांनाही पोलिसांचे आवाहन

हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे दर्जेदार हेल्मेट उपलब्ध व्हावे, यासाठी हेल्मेट विक्रेत्यांनाही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी हेल्मेट विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती विक्रेत्यांना करण्यात आली आहे.

त्याचबरोबर बाजारात विक्री होणाऱ्या हेल्मेटचा दर्जा उच्च प्रतीचा आहे का, तसेच त्याची किंमत वाजवी आहे का, याचीही नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारे हेल्मेट उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील आहे.

दंडापेक्षा नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची

हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जात असली, तरी नागरिकांना दंड करणे हा पोलिसांचा अंतिम उद्देश नाही. प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःहून हेल्मेट वापरावे, हेल्मेट वापरण्याची सवय अंगीकारावी आणि रस्ते अपघातात होणारी जीवितहानी कमी व्हावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न लातूर पोलिसांकडून केला जात आहे. कारवाईबरोबरच समुपदेशन, जनजागृती आणि सुरक्षित वाहनचालना यावर विशेष भर देण्यात येत आहे.

अपघातातील जीवितहानी शून्यावर आणण्याचा प्रयत्न

रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर असतात. त्यामुळे अपघात टाळणे, अपघात झाल्यास जीवितहानी कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही पोलिसांची प्रमुख भूमिका आहे.

लातूर जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये पूर्णपणे सकारात्मक बदल घडवून आणण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्याची सवय लावून घ्यावी आणि रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी होत होत ती शून्यावर यावी, हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा आग्रह आहे.

त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वारांनी पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करून प्रत्येक वेळी दुचाकी चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा, स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन लातूर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts