कै.भालचंद्र शंकरराव चाकूरकर यांच्या स्मरणार्थ शास्त्री शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Written by

in

उदगीर (एल पी उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय, उदगीर येथे प्रसिद्ध लेखक डॉ. नामदेव खंडेगावे यांच्या पुढाकारातून कै.भालचंद्र शंकरराव चाकूरकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे होते.प्रमुख पाहुणे म्हणून कै. भालचंद्र चाकूरकर यांच्या पत्नी भाग्यश्री चाकूरकर, सुपुत्र प्रभंजन चाकूरकर, नातेवाईक शारंगधर वालवाडकर, मित्रमंडळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभागप्रमुख सुधाकर पोलावार आणि श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक डॉ.नामदेव खंडेगावे यांनी कै.भालचंद्र चाकूरकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला, तसेच विद्यार्थ्यांना सुविचार, कविता व प्रेरणादायी विचारांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

यावेळी प्रभंजन चाकूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंधरा वर्षे विदेशात वास्तव्यास असूनही वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा जपण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. शास्त्री शाळेतून अनेक विद्यार्थी घडून विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत.आगामी दहा-पंधरा वर्षांत या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी मोठे अधिकारी व्हावेत,अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.अध्यक्षीय समारोपात व्यंकटराव गुरमे यांनी कै.भालचंद्र चाकूरकर यांच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आपल्याला अभिमान असल्याचे सांगत, समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून चाकूरकर कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे गौरवोद्गार काढले. या उपक्रमाबद्दल त्यांनी चाकूरकर कुटुंबीयांचे आभार मानून भविष्यातही अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम गौंडगावे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *