पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गावभेटी; नागरिकांशी साधला थेट संवाद,

Written by

in

उदगीर (एल पी उगीले) जिल्हा पोलीस अधीक्षक अमल तांबे यांच्या संकल्पनेप्रमाणे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची सुसंवाद सांगून येणाऱ्या संकटांची कल्पना तसेच त्यातून काय मार्ग काढता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची करडखेल येथे, तर सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघना यांची बोरगाव येथे भेट; एकाच दिवशी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १८ गावभेटी, ८४५ नागरिकांशी संवाद*

पाणीटंचाईच्या संभाव्य तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर आगामी पाच ते सात महिन्यांत ग्रामीण भागात निर्माण होऊ शकणाऱ्या विविध समस्यांचा वेळीच आढावा घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२६ पासून ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी थेट गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत असून, संभाव्य समस्या, कायदा व सुव्यवस्थेची आव्हाने आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा व मार्गदर्शन करीत आहेत.

लातूर जिल्ह्यातील एकूण १,०२१ गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट या उपक्रमांतर्गत निश्चित करण्यात आले आहे. पाणीटंचाईमुळे निर्माण होणारी सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षिततेशी संबंधित आव्हाने लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पाण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी, पाणीपुरवठ्यावरून निर्माण होणारे वाद, शेती व पशुधनाच्या सुरक्षेचे प्रश्न, शेती अवजारे व विद्युत मोटारींच्या चोरीच्या घटना, तसेच अवैध सावकारीसारख्या समस्यांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.

या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. काल दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडखेल येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. आगामी काळात पाणीटंचाईमुळे उद्भवू शकणाऱ्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे वाद व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न याबाबत त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. तसेच अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला कशा प्रकारे सहकार्य करावे, याबाबत मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे लातूर ग्रामीण उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती मेघना यांनी मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील संभाव्य समस्या जाणून घेत पाणीटंचाईच्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्न, सतर्कता आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.

एका दिवसात १८ गावांना भेटी; ८४५ नागरिकांशी संवाद

‘पोलीस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमांतर्गत दिनांक २९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील एकूण ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १८ गावांना भेटी दिल्या. या भेटींच्या माध्यमातून एकूण ८४५ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. गावागावांतील परिस्थिती समजून घेणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि संभाव्य प्रश्नांवर स्थानिक पातळीवरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार करणे, यावर या भेटींमध्ये भर देण्यात आला.

केवळ कायदा-सुव्यवस्था नव्हे, तर संकटाच्या काळात नागरिकांच्या सोबत पोलीस

पाणीटंचाईच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्या घडूच नयेत यासाठी आधीपासून नियोजन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य दृष्टिकोन आहे. गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसुरक्षा दल आणि पोलीस यांच्यात समन्वय निर्माण करून गावपातळीवर सुरक्षिततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नागरिकांनीही संभाव्य वाद, संशयास्पद हालचाली, चोरीच्या घटना तसेच इतर गैरप्रकारांबाबत सतर्क राहून पोलिसांना वेळेवर माहिती द्यावी. पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करताना सामाजिक सलोखा, संयम आणि परस्पर सहकार्य जपावे, असे आवाहन या भेटींच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व १,०२१ गावांपर्यंत पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम सातत्याने सुरू असून, संभाव्य संकटाचे रूपांतर कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येत होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावपातळीवर प्रतिबंधात्मक नियोजन आणि जनजागृतीवर विशेष भर दिला जात आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *