पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमांतर्गत लातूर पोलिसांच्या 241 गावांना भेटी; 12867 नागरिकांशी साधला संवाद

Written by

in

लातूर (एल पी उगीले)

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संभाव्य समस्यांवर उपाययोजनांसाठी पोलिसांनी पुढाकार घ्यायला सुरू केली आहे; ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या माध्यमातून गावपातळीवर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जातो आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर 2026 पासून ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत लातूर पोलिसांनी जिल्ह्यातील 241 गावांना भेटी देऊन 12 हजार 867 नागरिकांशी संवाद साधला आहे.

लातूर जिल्ह्यातील एकूण 1021 गावांमध्ये भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, संभाव्य अडचणींबाबत जनजागृती करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पाणीटंचाईमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष

पाणीटंचाईमुळे शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा विचार करून लातूर पोलीस दलाकडून आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

शेतीतील उत्पन्न घटल्यामुळे शेतातील पशुधन, कृषी अवजारे आणि इतर साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच शेतशिवारातील साहित्य व पशुधनाच्या सुरक्षेसाठी परस्पर समन्वयातून दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना

गावातील सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याच्या तरुणांना सोबत घेऊन ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना करण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात येत आहे. गावपातळीवर नागरिकांच्या सहभागातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि चोरीसारख्या संभाव्य घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, हा यामागील उद्देश आहे.

गावातील नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढवून ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

आर्थिक अडचणींवर कायदेशीर मार्गदर्शन

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटल्यास काही शेतकरी आर्थिक गरज भागविण्यासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची शक्यता असते. अशा व्यवहारांमधून भविष्यात आर्थिक अडचणी वाढू नयेत, यासाठी नागरिकांना आर्थिक गरज भागविण्याचे योग्य व कायदेशीर पर्याय समजावून सांगण्यात येत आहेत.

आर्थिक अडचणींच्या काळात घाईघाईने निर्णय न घेता कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा, तसेच अवैध सावकारी किंवा अन्य आर्थिक शोषणाच्या प्रकारांना बळी पडू नये, याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम केवळ पोलिसांच्या गावभेटीपुरता मर्यादित नसून, संभाव्य सामाजिक व आर्थिक समस्यांची पूर्वकल्पना घेऊन त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. गावातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, उपलब्ध उपाययोजनांची माहिती देणे आणि स्थानिक तरुणांच्या सहभागातून गावाची सुरक्षा मजबूत करणे, यावर भर दिला जात आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व 1021 गावांपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टाने हा उपक्रम पुढे सुरू राहणार असून, पाणीटंचाईच्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांना सामूहिक प्रयत्नांतून सामोरे जाण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *