लातूरात ऐतिहासिक स्टॅच्यु ऑफ नॉलेज अनावरण सोहळ्यास भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने औचित्य साधून लातूर येथे उभारण्यात आलेल्या ७२ फुटी प्रतिकृती अर्थात स्टॅच्यु ऑफ नॉलेजच्या अनावरण सोहळ्यास लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि.१४ एप्रिल रोजी १३१ वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीचे औचित्य साधून लातूरचे खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ७२ फुटी प्रतिकृती अर्थात स्टॅच्यु ऑफ नॉलेज लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात उभारण्यात आला आहे. कदाचित देशातील सर्वात मोठा पहिलाच हा स्टॅच्यु आहे.
या पुतळयाचे अनावरण जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवार दि. १३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या सोहळयासाठी केंद्रीय कायदा मंत्री ना. किरण रिजूजी, राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, औश्याचे आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जेष्ठ मार्गदर्शक गोविंदअण्णा केंद्रे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चाचे सदस्य शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार सुनिल गायकवाड, कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिपचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, लातूर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार व इतर अनेक मान्यवर तसेच जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या अनावरण कार्यक्रमासोबतच लेझर शो व नयनरम्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला घटना दिली आहे. या घटनेवर भारताची लोकशाही सामाजिक समतोल राखून यशस्वीपणे वाटचाल करत आहे. देशातील कोटयावधी नागरिकांचा हक्क सुरक्षित ठेवण्याची कायदयात तरतुद केलेली आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मांना आपलेसे वाटतात. लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असेही आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केली आहे.