डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी ‘भारतीय संविधान’ – डॉ.संतोष पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी 'भारतीय संविधान' - डॉ.संतोष पाटील

लातूर (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२२ रोजी १३१वी जयंती दयानंद कला महाविद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रंसगी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वतंत्र भारताची सार्वभौम राज्यघटना शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठरले. संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद इत्यादीपासून संरक्षण देणारी राज्यघटना ठरली आहे. भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे. घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळाले आहेत. भारतीय संविधान हे सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. मुलभूत अधिकार, समानता, अनुसूचित जाती-जमाती, जनजाती, धार्मिक, अल्पसंख्याक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारे संविधान ठरले आहे.तसेच शिक्षण, आरोग्य, संरक्षण, व्यवसाय, कंपनी, विद्यापीठ, न्यायालये, संसद, संघटना इत्यादी ठिकाणी संविधानाची मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदीनुसार नियोजन, संघटन, नियंत्रण, संदेशवहन, प्रशासन निर्माण करणारे आपले संविधान आहे. संविधानामुळे भारतीय राज्यव्यवस्थेला सुदृढ, सक्षम, समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करुन एक उत्तम, आदर्श संविधान निर्मिती केली. ते स्वत: आजारी असताना देखील दोन वर्षे 11 महिने व अठरा दिवस सातत्याने, समतोल विचाराची कल्याणकारी संविधान देशाला अर्पण केली आहे. भारताचा वैधानिक, औद्योगिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्कार, संस्कृती व मुल्यविषयक असा सर्वांगीण विकास गतिमानतेने होणे, भारत सर्वार्थाने स्वावलंबी बनविणे, भारतातील कुपोषण, दारिद्य्र, शोषण व विषमता नाहीशी होणे, रोजगार निर्मिती करणे, जगातील इतर देशांना प्रगतीसाठी प्रचंड मदत करण्याची क्षमता निर्माण करणे आणि भारत देश संपूर्ण जगाचा शांततामय व कल्याणकारी व विकसनशील देश बनविण्याकडे घटनात्मक तरतुदींचा विचार करुन आज संविधानाच्या तत्वावर देशाने वाटचाल करणे अत्यंत महत्त्वाचे प्रेरक ठरत आहे असे प्रतिपादन याप्रसंगी डॉ.संतोष पाटील यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, डॉ. सुनिता सांगोले, प्रा.विलास कोमटवाड, प्रा.सुरेश क्षीरसागर, कु.अरोही गोदाम, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव व महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author