डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसांची ओळख निर्माण करून देण्याचे कार्य केले – डॉ. चौकटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणसांची ओळख निर्माण करून देण्याचे कार्य केले - डॉ. चौकटे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील प्रमुख देशाच्या संविधानाचा अभ्यास करून मानव कल्याण आणि बहुजनांच्या व स्त्रियांच्या उद्धारासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करून माणसाला माणूसकीची ओळख त्यांनी करून देण्याचे महान कार्य केले, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले. ते अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय संविधान ‘ या व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. नागराज मुळे हे होते तर विचारमंचावर कार्यक्रमाचे संयोजक डॉ.बब्रुवान मोरे, डॉ. पांडुरंग चिलगर व डॉ. संतोष पाटील आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. चौकटे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्व वंदनीय आहेत. त्यांनी समस्त मानवांच्या कल्याणासाठी कार्य केले . आजीवन संघर्ष करत ज्ञानार्जन करून जागतिक कीर्तीचे विद्वान म्हणून त्यांची ओळख समस्त विश्वाला आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपाप्रसंगी प्रो. डॉ.नागराज मुळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये मानवता दिसून येईल आणि माणसा मधील स्वाभिमान जागृत होईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी तर आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author