श्रीमद् भागवत कथा मनोरंजनासाठी नाही तर जीवनाची व्यथा दूर करण्यासाठीआहे – ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर
अहमदपूर (गोविंद काळे) : मानव जन्म भाग्याने मिळाला आहे, दुसऱ्यांचे दुःख दूर करता येण्यासारखे काम करावे, संसारात राहूनही ईश्वराचे चिंतन करता येते श्रीमद् भागवत कथा त्यासाठीच आहे भागवत कथा मनोरंजनासाठी नाही तर जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी आहे असे विचार सुनेगाव (शेंद्री) येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळ्यामध्ये भागवताचार्य ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर कथाकार यांनी मांडले. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव ( शेंद्री )येथे दि.१३ एप्रिल २०२२ पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली असून कथेच्या पाचव्या दिवशी बोलताना ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर म्हणाले की, भागवत कथा ज्ञानाची गंगा आहे कथा ऐकल्याने संसाराची व्यथा दूर होते, जीवाचा उद्धार होतो पण कथा ऐकताना चित्त जागेवर असावे, भवसागरातून उद्धरून जायचे असेल तर कथा अवश्य श्रवण करावी, त्याशिवाय तरणोपाय नाही, संसारात नामस्मरण नाही केलं तर जंत सारखी स्थिती होईल संसाराचा आनंद निर्माण करावा, आपल्या जाण्याने कुणाला थोडे तरी दुःख वाटावं, सोने, चांदी, बंगला, पैसा सोबत काही येत नाही, प्रपंच जनावरे देखील करतात पण माणूस म्हणून एखाद्याची भूक भागवता आली पाहिजे, इतरावर प्रेम करता आलं पाहिजे यशोदेने श्री कृष्ण परमात्म्यावर जीवापाड प्रेम केलं, भक्तीमध्ये स्वार्थीपणा नसावा, संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांनी स्वतः दुःख सोसून जगाला सुखाचा मार्ग दाखवला, ईश्वरावर आर्त भावनेने प्रेम करा, भक्ती प्रेमाची, असावी भक्ती विना मानवाचा उद्धार होणार नाही असेही शेवटी ह.भ.प भागवताचार्य श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर म्हणाले. सुमधुर भक्तगीतांनी चैतन्य या भागवत कथेप्रसंगी भजन गायक कलाकारांनी सुमधुर भक्तगीते गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले गोपाळ महाराज नागरगोजे यांनी सिंथ वर तर भिमाशंकर महाराज पांचाळ अमडापुरकर यांनी तबल्यावर साथसंगत केली.