सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी अभाविपचे महानगरपालिकेत आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेतर्फे लातूर ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र पेठ येथे महानगरपालिकेची सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीला घेऊन अभाविपने आंदोलन केले. विद्यार्थी परिषदेने ५ एप्रिल २०२२ रोजी मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते. आणि सहा दिवसांची मुदतही दिली होती. परंतु ही मागणी मनपा प्रशासनाने मान्य केली नसल्याने अभाविपने आंदोलन केले. लातूर ते विद्यापीठ उपकेंद्र पेठ येथे मनपाची सिटी बससेवा सुरु झाल्यानंतर जवळपास एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पैशाची व वेळेची बचत होणार आहे. तसेच 430 विद्यार्थिनींना मनपाच्या बस सेवेमुळे मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे उच्च शिक्षणात विद्यार्थिनींची उपस्थिती वाढली जाईल व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोयीचे पडेल असे अभाविपचे देवगिरी प्रदेश सहमंत्री पवन बेळकोने यांनी सांगितले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.