अधिकाधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा – आ.धिरज देशमुख
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील भातांगळी येथे शेतीसाठी फायदेशीर ठरत असलेल्या टोकन पेरणी यंत्र व बीबीएफ पेरणी यंत्राची माहिती घेऊन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी स्वतः या यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक करून पाहिले. अधिकाधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे उद्दगार खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात आ.धिरज देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना काढले.
आ. धीरज देशमुख म्हणाले, धाडस करुन अनेकांनी सोयाबीनची टोकन पद्धतीने व बीबीएफ तंत्राद्वारे लागवड करुन चांगला रिझल्ट मिळवला आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवले आहे. विपरीत वातावरणातही अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी हे यश मिळवले आहे. हे चित्र आनंददायी देणारे आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोगांचा अधिकाधिक अवलंब व्हायला हवा. तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार होण्यापेक्षा शिक्षित शेतकरी व्हावे. ही काळाची गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षण देऊन शेतीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहित करावे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या गरजा व त्यांची अडचण लक्षात घेऊन नवनव्या योजना आणत आहे. आपल्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मदत व्हावी यासाठी जिल्हा बँक सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ६० हजार रुपयांचे कर्ज देते. शेती, पशुधनाबरोबरच घरगुती कारणांसाठी, शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. सर्वसामान्य शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँक कार्यरत आहे. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील, असा विश्वास आ. धिरज देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच परमेश्वर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, लातूर तालुका ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन दाताळ, सहदेव मस्के, नारायण पाटील, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, बालाजी सुरवसे आदी उपस्थित होते.