पक्षांतर्गत गटबाजी करणार्‍या भाजपा जिल्हाध्यक्षांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी

पक्षांतर्गत गटबाजी करणार्‍या भाजपा जिल्हाध्यक्षांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी

भाजपा पदाधिकार्‍यांचे माजी मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर 14 मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पक्षाअंतर्गत गटबाजी करून बैठकीसाठी केलेल्या आवाहनामध्ये काही मोजक्याज पदाधिकार्‍यांची नावे घेण्यात आली तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढविण्यात पहिल्यापासून योगदान देणारे भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासह अनेकांची नावे वगळण्यात आली. त्यांच्या या पक्षहितापेक्षा मनमानी कृतीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. यामुळे पक्षाचे आमदार व जबाबदार प्रतिनिधी असतानाही पक्षांतर्गत गटबाजी करणारे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांना पक्षाने समज द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा पदाधिकार्‍यांच्यावतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आलेले आहे.

भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी व राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब मराठवाड्यातील व लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व आहे. माजी मुख्यमंत्री यांच्या एकतर्फी व चुकीच्या कार्याविरूध्द सन 1986 पासून लढा उभारत त्यांच्या विरूध्द महाराष्ट्रात तिसर्‍या क्रमांकाची असणारी मार्केट कमिटी ताब्यात घेतली व सभापती होऊन ऐतिहासिक कार्य केले. सन 1995 मध्ये प्रस्थापितांच्या विरोधात 32 हजार मताधिक्याने विजय होऊन अत्यंत चांगले कार्य केले. लातूरची नगरपालिका दोन वेळा काँग्रेस विरोधात स्वतः पुढाकार घेवून सत्तेत आणली. 2017 मध्ये लातूर महानगरपालिकेत त्यांचे चिरंजीव अजितसिंह पाटील कव्हेकर यानी महानगरपालिकेत त्यांच्यासह पाच नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे त्यावेळी भाजपा महापौरही झाला. पक्षासाठी एकढे मोठे कार्य असूनही भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षांना जिल्हा परिषद व पंचायत समिती व इतर महत्त्वाच्या निवडणुकीसंदर्भात 14 मे 2022 रोजी झालेल्या त्या बैठकीचे निमंत्रण भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांना दिलेले नाही किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेल्या बैठकीच्या आवाहनामध्येही त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची ही कृती पक्षविरोधी व अहंपणाची आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीची दखल घेवून चुकीच्या कामात बदल करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा राज्य व्यापारी आघाडीचे संचालक बाबासाहेब कोरेे, भाजपा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, उपाध्यक्ष निळकंळराव पवार, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव शिंदे, भाजपाचे ग्रामीण जिल्ह्याचे चिटणीस बाबासाहेब देशमुख, भाजपाचे तालुकाउपाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षेनेते मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले.

जनसंवाद दौर्‍यातही ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नकारघंटाच
तीन महिण्यापूर्वी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांनी लातूर तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी व भाजपाच्या कार्याची व विचारांची माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्यावतीने देण्याचे कार्य केले. पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार सर्वांचे फोटो, बॅनर लावून प्रत्येक पंचायत समिती सर्कलवाईज बैठका लावल्या होत्या. त्या बैठकांचे निमंत्रण ग्रामीण जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांना साहेबांनी व आम्ही दिले होते. परंतु पक्षहिताचा विचार करूनही ते हजर राहिले नाहीत व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी उपस्थित राहू दिले नाही. त्यामुळे याबाबत माहिती घेवून भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षांना कामात बदल करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी द्यावी अशा विनंतीचे निवेदन दिले आहे.

About The Author