उदगीर रोटरीच्या वतीने शिक्षकांचा ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्काराने गौरव
उदगीर (एल.पी. उगिले) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने शिक्षकांचा ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्कार मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी देवून गौरव करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, सहयोग अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, रोटरी क्लबचे अध्यक्ष रामेश्वर निटुरे, उपाध्यक्षा ज्योती चौधरी, सचिव व्यंकटराव कणसे, प्रोजेक्ट चेअरमन किशोर पंदीलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहशिक्षिका मंजुषा कुलकर्णी, ज्योती स्वामी, रेखा पांचाळ, संगीता जाधव, अंबिका घनपाठी व शिक्षक राजेंद्रकुमार भोसले यांना राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी रोटरी आयोजित वृक्षदिंडी व वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी झालेल्या शाळा, महाविद्यालय व विविध संघटनांना यावेळी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांनी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी, शिक्षक हे आदर्श पिढी घडविण्याचे कार्य करीत असतात, शिक्षणक्षेत्र हे आदर्शतत्व असून ते कायम जपले गेले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त गुणवंत करून चालणार नाही तर सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक ऋण त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे.
शिक्षकांनी दिलेले ज्ञान, सुसंस्कार आणि सामाजिक जाणीव जपण्यासाठी पुरेशी शिदोरी असते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास विजयकुमार पारसेवार, महानंदा सोनटक्के, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, रविंद्र हसरगुंडे, प्रा. मंगला विश्वनाथे, प्रा. सुनिता लोहारे, सुनिता मदनुरे, चंद्रकांत ममदापुरे, विद्या पांढरे, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. सुधीर जाधव, आशिष अंबरखाने, बिपिन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश आंबेगावे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव व्यंकटराव कणसे यांनी केले.