महात्मा गांधी सहकारी नागरी पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक गौरवशाली मानाचा तुरा !!उदगीरच्या सहकार क्षेत्रातील क्रांतीची पावती!!!
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथील सहकार महर्षी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूरे यांच्या संकल्पनेतून आणि सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांना उद्योगधंदे उभारण्यासाठी अर्थसाह्य करावे. अशी सामाजिक भूमिका घेऊन 2009 साली त्यांनी महात्मा गांधी सहकारी नागरी पतसंस्थेची स्थापना केली. प्रत्येक वेळी या नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. तसेच अत्यंत कमी वेळात लोकांचा दांडगा विश्वास निर्माण झाल्यामुळे यशोशिखरापर्यंत ही सहकारी पतसंस्था पोहोचली. आकाशाला गवसणी घालावी म्हणतात, त्याचे जिवंत उदाहरण म्हणून महात्मा गांधी सहकारी नागरि पतसंस्थेकडे पाहता येऊ शकेल! कारण सतत तीन वर्ष राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार या महात्मा गांधी सहकारी नागरी पतसंस्थेने मिळवले आहेत.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यासोबतच अनेक मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार युवा नेते तथा या पतसंस्थेचे उपाध्यक्ष चेतन भैय्या वैजापूरे यांनी स्वीकारले आहेत. यापूर्वीही विविध पुरस्कार व गौरव या पतसंस्थेने मिळवलेले आहेत. दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी अतिशय मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी नागरी पतसंस्थेत देण्यात येणारा “दीपस्तंभ” पुरस्कार यावर्षी उदगीर येथील महात्मा गांधी सहकारी नागरी पतसंस्थेने पटकावून केवळ पतसंस्थेच्याच नव्हे तर उदगीरच्या वैभवात हा मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.
गणपतीपुळे येथे झालेल्या भव्य दिव्य समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक ओम प्रकाश दादाअप्पा उर्फ काका कोयटे व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पतसंस्थेचे कर्मचारी सचिन उखंडे व अनुपम जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सदरील मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा इतर कोणतेही पदाधिकारी न जाता, ज्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक भूमिका जपणाऱ्या वर्तणुकीमुळे तथा या पतसंस्थेला आपली स्वतःची पतसंस्था समजून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सन्मान मिळावा. या हेतूने सदरील मानाचा पुरस्कार स्वीकारण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली.
पतसंस्थेच्या इतिहासात हा एक नवा मानदंड महात्मा गांधी पतसंस्थेने घालून दिला आहे. याचा आदर्श इतर पतसंस्थांनी घेतला पाहिजे. ही पतसंस्था खरोखरच महाराष्ट्रातील इतर पतसंस्थांसाठी दीपस्तंबासारखेच उत्कृष्ट कार्य करून जनसामान्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत आहे. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ हा मानाचा पुरस्कार दिला आहे.
महात्मा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल या पतसंस्थेचे संस्थापक व संस्थेचे मार्गदर्शक सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे, अध्यक्ष डॉ. बसवराज मलशेट्टे ,उपाध्यक्ष युवा नेते चेतन भैया वैजापूरे, या महात्मा गांधी सहकारी नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक हनुमंत करपे यांच्यावर सहकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रातील प्रथित यश प्रतिष्ठित मान्यवराकडून कौतुकाचा व अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
उदगीर साठी हा पुरस्कार म्हणजे अत्यंत सन्मानाचा व गौरवाचा आहे. सर्व सहकारी कर्मचारी आणि या पतसंस्थेचे सर्व सदस्य यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपल्याला प्रगतीचा हा टप्पा गाठता आला. असा विश्वास याप्रसंगी युवा नेते चेतन भैय्या वैजापूरे यांनी व्यक्त केला आहे.