2 ऑक्टोबर 2022 महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2000 वृक्षारोपण
उदगीर (एल.पी. उगिले) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून एक कोटी महावृक्ष लागवड अभियान देश विदेशात राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ ऑक्टोंबर २०२२ महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्नाटक, आंध्र या राज्याच्या सीमेवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील जवळच असलेल्या राजराजेश्वरी मंदिर, देगलूर रोड मल्लापुर परिसरात गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 2000 वृक्षारोपण सकाळी ठीक १०.०० वाजता करण्यात येणार आहे.
या ठिकाणी 18 विभागाचे स्टॉल उभारणी करण्यात येणार आहेत.यामध्ये विवाह संस्कार विभाग अंतर्गत मोफत वधू वर नाव नोंदणी, बाल संस्कार विभागांतर्गत निर्व्यसनी पिढी घडवणे, गर्भसंस्कार शिशु संस्कार, जनकल्याण योजना, वास्तुशास्त्र विभाग, प्रश्न उत्तर विभाग, मराठी अस्मिता व मराठी संस्कृती या अशा विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका प्रतिनिधी, केंद्र प्रतिनिधी, कार्यरतसेवेकरी,१८ विभागाचे प्रमुख,सेवेकरी, भाविक भक्त यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन जय वीर हनुमान मंदिर, बिदर रोड उदगीर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख निवृत्ती जवळे यांनी केले आहे.