क्रांतिकारी संत महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर महात्मा फुले महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : बाराव्या शतकात भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावून सामाजिक क्रांतीची सुरुवात करणारे लिंगायत धर्माचे संस्थापक, महान क्रांतिकारी संत महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि कार्यावर येथील महात्मा फुले महाविद्यालयात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्लोबल संस्कृत फोरम नवी दिल्ली यांच्या सहकार्याने महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने शुक्रवार दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून आभासी पद्धतीने होणाऱ्या या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार असून, यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. चीनच्या ग्वांगडांग विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. विवेक मणि त्रिपाठी हे या चर्चासत्राचे उद्घाटक आहेत. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर येथील सुप्रसिद्ध विचारवंत आणि इतिहासकार डॉ. सोमनाथ रोडे तर बीजभाषक म्हणून कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाचे प्रोफेसर वीरशेट्टी मैलूरकर हे उपस्थित राहणार आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. सदाशिव दंदे यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंध वाचन सत्र होणार असून, या सत्रामध्ये डॉ. नलिनी वाघमारे ( पुणे), डॉ. मंजुश्री डोळे ( ठाणे) व पत्रकार राम तत्तापुरे ( अहमदपूर) हे अभ्यासक सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात जास्तीत जास्त प्राध्यापक, संशोधक अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी, व्हावे असे आवाहन चर्चासत्राचे संयोजक डॉ. बब्रुवान मोरे, तसेच ग्लोबल संस्कृत फोरमचे डॉ. राजेश मिश्रा यांनी केले आहे.