डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे भारत सशक्त होण्याचे स्वप्न होते – इतिहास संशोधक डॉ. नारायण भोसले

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे भारत सशक्त होण्याचे स्वप्न होते - इतिहास संशोधक डॉ. नारायण भोसले

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ‘ या ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने शानदार प्रकाशन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : वैज्ञानिक क्षेत्रात क्रांती करून जगात भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे महान कार्य माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले. त्यांनी सशक्त आणि सक्षम भारताचे स्वप्न पाहिले होते आणि ते साकार करण्यासाठी तरुणांनी वैज्ञानिक क्षेत्रात उतरावे असे आवाहन ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि मुंबई विद्यापीठातील इतिहास विभातील प्रसिद्ध संशोधक प्रा. डॉ. नारायण भोसले यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. वैश्विक संस्कृत मंच नवी दिल्ली, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक , समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर, यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – श्रीरंगराव पाटील एकंबेकर आणि सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. नारायण भोसले म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ वैज्ञानिकच नव्हते तर, दूरदृष्टीचे राजकीय नेते आणि सामाजिक क्रांतीकारक ही होते. आयुष्यभर त्यांनी केवळ देशाच्या कल्याणासाठी कार्य केले, असेही ते म्हणाले.

आभासी पद्धतीने झूम मीटिंगवर झालेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. सेन पाठक म्हणाले की,डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान भारतरत्नास मी प्रत्यक्ष तीन वेळा भेटलो. त्यांच्यातील साधेपणा आणि त्या साधेपणातील महान विचार ऐकण्याची संधी मला मिळाली. याबद्दल मी स्वत:ला धन्य मानतो. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेले भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.

चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रामभाऊ मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अकबर लाला( उस्मानाबाद), डॉ. सुरेश दांडगे ( सांगली) आणि डॉ. नाथराव घरजाळे (अंबाजोगाई) यांनी शोधनिबंधाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाचन केले. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या ऐतिहासिक वाचन, लेखन कार्याचाही गौरव केला. याप्रसंगी आभासी पद्धतीने ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. मान्यवरांच्या संदेशांचे वाचन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर, सूत्रसंचालन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. आतिश आकडे यांनी केले व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांनी केले. या चर्चासत्रात देश विदेशातील चारशेहून अधिक अभ्यासक तसेच प्राचार्य, पत्रकार, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

About The Author

error: Content is protected !!