महात्मा फुले महाविद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची कार्यशाळा संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे) : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली.
महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत लातूर येथील समाज कल्याण विभाग कार्यालयाचे तालुका समन्वयक अमोल मुळे आणि गंगाधर जोगदंड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासंबंधी आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती दिली. तसेच महाडीबीटी पोर्टल बद्दलही सविस्तर माहिती दिली. अचूक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासंबंधी प्रोजेक्टरवर माहिती दिली.विविध सूचनाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संबंधी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिष्यवृत्ती ही शिक्षण घेण्यासाठी महत्त्वाची सुविधा असून विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संबंधी जागरूक राहून आपल्या पालकांना दंड बसणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेच्या आत शिष्यवृत्ती फॉर्म भरावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यालयीन वरिष्ठ लिपिक श्री. अजय मुरमुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.