एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संस्कारक्षम पिढी घडते – ह भ प डॉ.तेलगाणे

एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संस्कारक्षम पिढी घडते - ह भ प डॉ.तेलगाणे

उदगीर (एल. पी. उगिले) : समाजामध्ये जोपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती, तोपर्यंत घरी जन्माला आलेल्या लहान लहान बाळांना त्याचे आजी- आजोबा, काका- काकी, मामा- मामी, आत्या हे सुसंस्कार देत होते. मात्र वेगवेगळ्या कारणाने आजची पिढी कोणी नोकरीच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या निमित्ताने विभक्त राहत आहेत. परिणामतः घरी जन्माला येणाऱ्या लहान मुलांना आजी- आजोबा, काका- काकी, आत्या, मामा या संस्कारक्षम नात्यामधले भावबंध मिळेनासे झाले आहेत.

एकत्र कुटुंब पद्धती मध्ये एक दुसऱ्याच्या चुकावर अंकुश ठेवण्याचे काम होत होते. मात्र सध्याच्या सुशिक्षित सुनांना आपल्या सासू-सासर्‍यांनी जास्त तत्त्वज्ञान सांगू नये, असे वाटू लागले आहे. त्यामुळे लहान सहान कारणावरून सासु- सुना मध्ये वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीचा जन्म झाला. त्यासोबतच सुसंस्कारक्षम पिढी घडवणारी जुनी माणसे देखील एकाकी पडली. असे विचार ह भ प डॉ. शरद तेलगाने यांनी उदगीर येथील संतोषी माता नगर येथील मंदिरामध्ये 35 वी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनरुपी प्रबोधनात सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक गणेश गायकवाड, रामराव भोसले, बालाजी तेलंगे, तसेच यनकी, गणेशपुर, शेल्हाळ रोड येथील भजनी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गायक व्यंकटराव दोडके, संदिपान महाराज किणीकर, रामराव काटेकर यनकी, काळजी महाराज व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रमाकांत गाजरे, गणेश काळे, संतोष काळे, मंजुळा दादाराव रावजी यांनी परिश्रमपूर्वक केले होते.

पुढे बोलताना ह भ प डॉ. तेलगाणे म्हणाले की, सध्या समाजामध्ये आपापसात जी दरी निर्माण झालेली दिसते आहे. त्याला एकमेव कारण संस्काराचा अभाव आहे. त्यामुळे शक्यतो एकत्र कुटुंब पद्धती ही काळाची गरज आहे. अर्थकारणासाठी विभक्त राहणे आवश्यक असले तरी त्यालाही मार्ग काढता येऊ शकतात. असेही त्यांनी सांगितले. तसेच वृद्धांना वृद्धाश्रमात सोडून त्यांच्या मृत्यूनंतर श्राद्ध करण्यात कोणताही पुरुषार्थ नाही. आई- वडील जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करावी. कारण त्यांच्याच रूपाने परमेश्वर आपल्या घरी असतो, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author