उदगीर ते शिरुर हा ३० कि.मी.चा रस्ता तात्काळ करावा,मुख्यमंत्र्याकडे आ.संजय बनसोडे यांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातुन जाणारा नांदेड – बिदर हा मुख्य रस्ता असुन सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावरुन ये – जा करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना वाहन चालवताना त्रास होत आहे. त्यातच उदगीर शहर व तालुक्यातुन अहमदपूर व नांदेड जिल्ह्याला जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यातच नांदेड येथून बिदरला जाणाऱ्या शिख बांधवांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचीही गैरसोय होत असल्याने सदर उदगीर ते शिरुर हा ३० कि.मी.चा रस्ता तात्काळ करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ.संजय बनसोडे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
सदर निवेदनात आ.बनसोडे यांनी, उदगीर विधान सभा मतदारसंघातील उदगीर – शिरुर रा.मा.क्र. २४९ कि.मी. ३२ हायब्रीड अम्युनिटी मोड अंतर्गत मंजूर करावा, कारण सदरील रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ या रस्त्याला जोडणारा असून सदर रस्ता हा लिंक रस्ता आहे. ज्यांची लांबी जवळपास ३२.०० कि.मी. आहे. हा रस्ता अत्यंत महत्वाचा असुन या रस्त्यावरुन मोठया प्रमाणावर रहदारीचा असते . यापुर्वी मतदारसंघातील उदगीर-जळकोट-कंधार राज्य मार्ग क्र. २५० आहे, सदरील रस्ता हायब्रीड अम्युनिटी मोड अंतर्गत मंजूर झाला होता. परंतू राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० मंजूर होऊन सदरील काम रा.मा. अंतर्गत पुर्ण झालेले आहे. त्यामुळे हायब्रीड अम्युनिटी मोड अंतर्गत पुर्वी मंजूर झालेल्या कामाऐवजी उदगीर-शिरुर रा.मा.क्र. २४९ कि.मी. ३२ हायब्रीड अम्युनिटी मोड अंतर्गत मंजूर करावा. अशी विनंती आ. संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.