शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचे शुभारंभ करण्यात आले. सदर योजनेचे उद्घाटन शेतकरी व्यंकटराव भाऊराव पाटील मोरतळवाडीकर यांच्या हस्ते केले. उद्घाटन प्रसंगी नांदापूरकर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था उदगीर व बाजार समितीचे प्रशासक महादेव शिंदे तसेच बाजार समितीचे सचिव भगवान पाटील बेटमोगरेकर सर्व शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर योजनेतून शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाच्या 75% प्रमाणे श्री व्यंकटराव पाटील शेतकरी यांना 57000/- चा धनादेश देण्यात आला.
पिक तारण विमा योजना यशस्वी करता यावी यासाठी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मोठ मोठ्या गोदामाची निर्मिती करून शेतकऱ्यांची सोय केली आहे. विद्यमान स्थितीत त्याच गोदामाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत आपली पिक या गोदामात ठेवता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून बाजारभावात असलेल्या किमतीच्या 75 टक्के इतकी रक्कम तात्काळ देण्यात येणार आहे सदरील रक्कम ही बाजार समितीच्या खात्यातून देण्यात येणार असून तदनंतर सदरील रक्कम पण महासंघाकडून मंजूर करून घेण्यात येणार आहे अशा लोककल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे सातबारा,8अ, पिक पेरा,, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स देण्यात यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.