स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; 8 मोटरसायकल, 4 मोबाईलसह 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
8 गुन्हे उघडकीस 03 आरोपींना अटक
लातूर (एल.पी.उगीले) : पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे योग्य काम करून घेण्याचे कौशल्य जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या अंगी असावे लागते, हेच जनू नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दाखवून दिले आहे. लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून प्रभार घेतल्याबरोबर पहिल्याच बैठकीत जिल्ह्यातील गुणवंत आणि कर्तबगार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा योग्य तो गौरव करून, त्यांचे फोटो एक महिन्यासाठी दर्शनीय भागात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लावून प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. याचा परिणाम जिल्हाभरात दिसू लागले आहेत. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या क्षमातेपेक्षाही जास्त मेहनत घेताना दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील वाहन जुपिटर कंपनीची स्कूटर घेऊन संशयित आरोपी नामे अविनाश चव्हाण हा खाडगाव परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ खाडगाव परिसरात पोचून रोडवर ज्युपिटर स्कूटरसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश धनाजी चव्हाण, वय 23 वर्ष, राहणार संभाजीनगर, खाडगाव रोड, लातूर. असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची ज्युपिटर स्कूटर काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन साथीदारांसह मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीचे साथीदार नामे राहुल बब्रुवान शेंडगे, (वय 28 वर्ष, राहणार समर्थ सोसायटी, लातूर), महेश देविदास सरवदे, वय 21 वर्ष, राहणार भोईगल्ली, गांधी मार्केट, लातूर ) यांना अतिशय शिताफीने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद तीन आरोपीकडून चोरीच्या 8 मोटारसायकली, चोरीचे 4 विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण 3 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील 3 , एमआयडीसी हद्दीतील 2 , रेणापूर 1, चाकूर 1 ,गांधी चौक 1 असे येथील 08 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर च्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठान्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, तूराब पठाण,राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव , प्रमोद तरडे, नाना भोंग , मोहन सुरवसे, राजेश कंचे, तुराब पठाण, रवी कानगुले, नितीन कठारे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.