हेल्मेटमुळे डॉक्टरांचा जीव वाचला; मद्यधुंद कारचालकाविरुद्ध औसा पोलिसांत गुन्हा दाखल.
लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अपघातातून पुन्हा अधोरेखित झालेला महत्त्वाचा संदेश..
रस्ते अपघातांमध्ये हेल्मेटचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे. याची प्रचिती औसा-लातूर मार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातातून पुन्हा एकदा आली आहे. भरधाव वेगाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या कारचालकाने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक डॉक्टर गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट परिधान केले असल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची बाब समोर आली आहे.
दि. १० जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास औसा-लातूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. फिर्यादी डॉ. रंजीत गणपत नारायणकर (वय ३१ वर्ष), व्यवसाय डॉक्टर, रा. विवेकानंद चौक, लातूर हे आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना इर्टिगा कार क्रमांक MH-25 BA-6142 चा चालक पंडीत भारत पवार, रा. शिवणी चौक, धाराशिव याने मद्यप्राशन करून निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवत त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात डॉ. नारायणकर जखमी झाले असून त्यांच्या मोटारसायकलचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या पाठीवरील बॅगेमध्ये असलेले वैद्यकीय साहित्य व लॅपटॉपचे अंदाजे १ लाख ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण सुमारे २ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याने तत्काळ कारवाई करत आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुरनं ३०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे
या अपघातातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फिर्यादी डॉक्टरांनी हेल्मेटचा वापर केला होता. त्यामुळे गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली. अनेकदा दुचाकीस्वार हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र या घटनेतून हेल्मेट हे केवळ नियमपालनासाठी नसून जीवनरक्षक कवच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच दुचाकीस्वारांनी दर्जेदार हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन औसा पोलिसांकडून करण्यात आले आहे. एक क्षणाची निष्काळजीपणा आयुष्यभराची वेदना ठरू शकते; मात्र हेल्मेटचा एक साधा निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो. औसा येथील ही घटना त्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
