स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद, शस्त्र पुरवठादाराविरोधातही गुन्हा दाखल.
लातूर(एल पी उगीले) पोलिसांची अवैध शस्त्रांविरोधातील धडक मोहीम; ४५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त.
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका आरोपीस गावठी पिस्टल व मॅगझीनसह ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १० जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. माने यांचे पथकाला सायंकाळी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, एक इसम अनधिकृत गावठी पिस्टल बाळगून एलआयसी कॉलनी परिसरातील सुतमील झोपडपट्टी भागात संशयास्पदरीत्या थांबलेला आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
पथकाने एलआयसी कॉलनी येथील सुतमील झोपडपट्टी परिसरात छापा टाकून संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव
आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे (वय २६ वर्ष, रा. पळशी, ता. रेणापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेस एक गावठी पिस्टल व मॅगझीन आढळून आले.पोलिसांनी तात्काळ गावठी पिस्टल व मॅगझीन जप्त केला. पुढील चौकशीत आरोपी आकाश ऊफाडे याने हे गावठी पिस्टल नानासाहेब अर्जुन ऊफाडे, (रा. पळशी, ता. रेनापुर ) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार शस्त्र पुरवठादाराविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे व नानासाहेब अर्जुन ऊफाडे या दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३(१)/२५ अन्वये पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे अथवा त्यांचा वापर करणे ही गंभीर स्वरूपाची बाब असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध लातूर पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस अमलदार युवराज गिरी, मोहन सुरवसे, जमीर शेख, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे, प्रदीप स्वामी, हरी पतंगे यांनी केली आहे.
