भारतीयांचा आचरणीय राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान – प्रा. राजेंद्र चव्हाण

भारतीयांचा आचरणीय राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान - प्रा. राजेंद्र चव्हाण

उदगीर : (एल.पी.उगीले ) : नागरिकांच्या सक्रिय सहभागावरच संविधान व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. भारतीय संविधानाने मानवीय चेहरा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांचा आचरणीय राष्ट्रग्रंथ म्हणून संविधानाकडे पाहणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रा. राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, दिनविशेष समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला समितीद्वारे आयोजित ‘भारतीय संविधान आणि नागरिकांची कर्तव्य’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी हे होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य प्रशांत पेन्सलवार, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा. चव्हाण म्हणाले, भारतीय संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्था, एकेरी नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा स्वीकार केला आहे तसेच राज्य आणि देश यांच्यासाठी एकच संविधान आहे. भारतीय संविधान ज्याप्रमाणे मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते त्याप्रमाणेच मूलभूत कर्तव्याची देखील आठवण करून देते. सर्व भारतीय नागरिकांनी कर्तव्यांचे पालन करून भारतीय संविधानाचे संवर्धन करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके म्हणाले, हा देश संविधानावर चालला पाहिजे. जगातील विविध राज्यघटनांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर असला तरी देखील भारतीय संविधानाचे वेगळेपण आजही टिकून आहे. संविधान वाचनाबरोबरच संविधानाचे अनुकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्वैराचार नियंत्रित करण्याचे काम संविधानाने केले आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मनोहरराव पटवारी म्हणाले, भारतीय नागरिक विज्ञाननिष्ठ व संविधानाला प्रमाण मानणारे असले पाहिजेत. भावी पिढ्यांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. संविधानाचे संवर्धन करण्याची जबाबदारी तरुणाईची आहे. प्रत्येकाने अधिकार व हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. गौरव जेवळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बंकट कांबळे यांनी तर आभार डॉ. बालाजी होकरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण अंबेसंगे, डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी पुढाकार घेतला.

About The Author