प्रामाणिक डाॅक्टर म्हणजे ईश्वराचे रुप – आ.संजय बनसोडे
उदगीर : येथील उदयगिरी नेत्ररुग्णालच्या माध्यमातून दृष्टीहिन असलेल्या नागरिकांना दृष्टी देवून ही सृष्टी दाखवण्याचे काम या नेत्र रूग्णालयाच्या माध्यमातून होत असुन अंधत्व निवारण केल्याने उदगीरची ओळख देश पातळीवर निर्माण झाली आहे. याचे सर्व श्रेय येथील नेत्रतज्ञ डाॅक्टरांना जाते. आपल्याकडे डाॅक्टरांना ईश्वराचा दर्जा आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे हजारो डाॅक्टर आहेत. त्यांच्या योग्य उपचारामुळेच आपण निरोगी राहतो, म्हणून आपल्या समाजातील डाॅक्टर म्हणजे ईश्वराचे रुप आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी काढले.
ते उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बसवराज पाटील , उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया, ह.भ.प. निरंजन भाईजी महाराज, प्रा. महेश बसपुरे, सुरेश देबडवार, अजय मलगे, विवेक जैन, सुदर्शन मुंढे, सुभाष वाकुडे, ईश्वरप्रसाद बाहेती उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, नेत्ररुग्णालयात येणाऱ्या नेत्ररुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावाने या रूग्णालयाच्या परिसरात धर्मशाळेचे बांधकाम आपण करत असुन त्यासाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी त्यांना ५० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असुन उर्वरित निधी मिळेल असे सांगितले.
दृष्टीदानाचे महान कार्य या उदयगिरी लाॅयन्स नेत्ररुग्णालयाच्या माध्यमातुन होत असुन आजपर्यंत या रूग्णालयाच्या वतीने सुमारे ४१२० नेत्रचिकित्सा शिबीरे घेण्यात आली आहेत, तर जवळपास १५० गावे ही अंधत्वातुन मुक्त झाली. १,६०,००० रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे कार्य कौतुकास्पद आहे. सन २०१३ पासून नेत्र रुग्णालय मार्फत रुग्णांकरिता दहा ठिकाणी व्हींजन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या व्हिजन केंद्राच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून अंध मुक्तीचे सामाजिक कार्य केले जात आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी सांगून या रुग्णालयासाठी व गेल्या दोन दशकापासून रुग्णसेवेत असणारे डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्यासह सर्व टिमचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. बालाजी आदेप्पा वलांडीकर व डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले. या कार्यक्रमास मराठवाड्यातून आलेले सर्व शिबिर संयोजक तसेच दीनदयाळ उपाध्याय केंद्राचे सर्व विद्यार्थी, नेत्र रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.