राज्यातील सध्याचे सरकार घटनाबाह्य – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टिका
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. राज्यात महिला आमदार सुरक्षीत नाही. महागाई, बेरोजगारी वाढली आहे, त्यावर सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अहमदपूर मतदारसंघातील नूतन सरपंच सर्व सदस्य व शिक्ष क आमदार विक्रम काळे यांच्या आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, सत्कारमूर्ती शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अकबर शेख,सुरज चव्हाण, संजय शेटे, रघुनाथ कुचेकर, भारत चामले हे उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, या घटनाबाह्य सरकारचे काय होणार याचा निर्णय लागायचा आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. सध्या राज्यात महागाई बेरोजगारी वाढली आहे. मंत्रीमंडळात महिलांना स्थान देण्यात आलेले नाही. साखर निर्यात केली असती तर भाव वाढले असते. सध्या आमदार महिलाही सुरक्षित नसल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांच्यावर दगड फेकले हे आम्ही खपवून घेणार नसल्याचे सांगितले. आमचे सरकार खूप • चांगले चालले होते. आम्ही आरोग्य, शिक्षण यांची चांगली कामे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन सरपंच सदस्यांनी गावातील कारभार हा निष्पक्षपातीपणे करावा, गावात पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, अंगणवाडी, शैक्षणिक व्यवस्था, विजेची बचत करावी, गाव स्वच्छ सुंदर करावे, गाव हागणदारीमुक्त असावे, तंटामुक्त गाव करणे आवश्यक आहे, सर्व जाती धर्माचा आदर करावा, साधुसंतांचे विचार घरापर्यंत पोहचवावेत, महापुरुषांचा आदर करावा, महिलांचा आदर करावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, या अहमदपूर चाकूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणलेला आहे. या मतदारसंघात विकासाची कामे त्यांच्यामुळेच झाली आहेत. सध्या अहमदपूर पंचायत समिती व क्वार्टरचे काम नविन होणार आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. अर्थसंकल्पात सर्वांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम आहे. सध्या यांत्रिकीकरण होणे खूप आवश्यक असून आमच्या सरकारने पूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे सांगून येणाऱ्या काळात आरोग्य, शिक्षण शेती याविषयीची कामे करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविणार आहोत तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चीत असल्याचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव काळे, शिवानंद हिंगणे,माधवराव जाधव, गणपतराव माने, सुरज पाटील, मीनाक्षी शिंगाडे, सुदर्शन मुंडे, अजहर बागवान, दयानंद पाटील, प्रशांत भोसले, सोमेश्वर कदम, डी.के. जाधव, महेश देवणे, शाहू कांबळे, अनुराधा नळेगावकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने, प्रा. मारोती बुद्रुक यांनी तर आभार शिवानंद हेंगणे यांनी मानले.