आरोग्य विभागामार्फत अतिजोखीमग्रस्त भागात 8 मार्चपासून सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम
लातूर (प्रतिनिधी) : क्षयरोगाच्या खोकला व ताप असणाऱ्या लक्षणांपासून अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे नागरिक सहजासहजी लवकर उपचार करुन घेत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने दिलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात 8 मार्च ते 21 मार्च 2023 पर्यंत अतिजोखीमग्रस्त भागात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोधण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील 10 टक्के आणि शहरी भागातील 10 टक्के अतिजोखीमग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा घरोघरी जावून सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये स्वंयसेवकाच्या माध्यमातून लक्षणांची तपासणी केली जाणार असून लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे पुन्हा तपासणी केली जाईल. तसेच या मोहिमेत आढळणाऱ्या क्षयरुग्णांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एस. फुलारी यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही वडगावे, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ते तालुका स्तरापर्यंत या सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताप असणे, वजनात घट होणे, थुंकी वाटे रक्त जाणे, मानेवर गाठ असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची संशयित म्हणून नोंद घेवून त्यांची पुढील तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. आपल्या घरी येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून तपासणी करुन घेवून मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.