अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची ‘सत्यशोधक समता’ वारी..!
अहमदपूर, ( गोविंद काळे)
‘या रे… या रे …सारे जन… नारीनर… यातीहिन …!’ च्या गजरात जाती-धर्म, वर्ग, वर्ण, लिंग भेद नाकारुन संतांनी महाराष्ट्रात कैक वर्षांपूर्वी सुरू केलेली समतेची वारी आजही अव्याहतपणे सुरू आहे..! त्यात ‘महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या वतीने सत्यशोधकी समता वारी’ आपला सहभाग नोंदवत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या मराठी विभागाच्या वतीने संस्थेच्या आरंभापासूनच लाभलेला वारकरी परंपरेचा वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवण्याच्या उदात्त दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे ही वारी प्रस्थान झाली आहे. सदर वारी ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने ‘महात्मा फुले सत्यशोधक वारी समतेची ‘ सुरू झाली असून, अहमदपूर ते पंढरपूर वारीमध्ये महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह मराठी विभागातील प्राध्यापक व सुप्रसिद्ध सत्यशोधक कीर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे, सत्यशोधकी विद्रोही कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब, वाहन चालक हुसेन शेख हे सहभागी झाले आहेत. महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने दिंडी मार्गावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या सत्यशोधक समता वारीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी, आयक्यूएसी विभाग प्रमुख प्रा. आतिश आकडे व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे, समाज शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. संतोष पाटील, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर,कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर आदिंनी शुभेच्छा दिल्या.